Jalgaon Ganesh Festival: गणपती बाप्पाचे आगमनासाठी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झालेली असतांनाच आता गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी संभाव्य अडथळे आणि समस्या दूर करण्याबाबत संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.
‘या’ मार्गाची पाहणी
दरम्यान शिवतीर्थ मैदान येथून या पाहणीला सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य बाजारपेठेसह विसर्जन मिरवणुकीच्या नियोजित मार्गाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण कंपनी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर नियोजन
तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी मोठी गर्दी होते असते. त्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन, गर्दीवर नियंत्रण आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन खबरदारी गेट आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे वेळेत दूर करून प्रशासनाकडून गणेश विसर्जनासाठी शहर सज्ज करण्याचे काम सुरू आहे.
वीज तारा- डीपी आणि खड्ड्यांची पाहणी
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील विविध समस्यांची पाहणी करण्यात आली. महावितरण कंपनीच्या विद्युत तारा आणि उघड्यावरील डीपी, रस्त्यांमध्ये असलेले खड्डे तसेच विर्सजन मार्गातील अडथळ्यांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. तसेच संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेश मंडळांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजनावरही चर्चा करण्यात आली.








