Maharashtra Drought: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यात वॉटर कप अभियानाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अभिनेते आमिर खान, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जलसंधारणासाठी एकात्मिक कार्ययोजना तयार करा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उत्तम नेतृत्व व कार्यक्षमता दाखविली आहे. अडचणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा उत्साहाने आणि जबाबदारीने कामाला लागल्यास कामाचा वेग वाढतो, हे आपण अनुभवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेपासून काम सुरू असल्याचे चित्र यापूर्वी दिसले आहे. त्याच कार्यतत्परतेने आणि समर्पित भावनेने आता जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जलसंधारणाच्या कामांसाठी या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.









