Jalgaon News: सण-उत्सवाचे दिवस सुरू होताच शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. मात्र, याच काळात नागरिकांच्या आरोग्याशी उघड-उघड खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या मोदकसाठी खोबरा कीस, पिठीसाखरेमध्ये आणि विविध मिठाईत मोठ्या प्रमाणावर भेसळ करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अशी केली जाते भेसळ
गणेशोत्सवात मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या पिठीसाखरमध्ये मैदा आणि खोबरा कीसमध्ये तांदळाचे पीठ आणि रव्याचे मिश्रण करून सर्रास विकली जात आहे. शुद्ध खोबरा कीस व पिठीसाखरेच्या नावाखाली ग्राहकांची उघडपणे फसवणूक सुरू आहे. याशिवाय, सणासुदीत मागणी वाढल्याचा गैरफायदा घेत मिठाई दुकानदारांकडून खवा व मिठाई तयार करताना मक्याचे पीठ, मैदा, दुध पावडर, डालडा तूप, स्टार्च आणि घातक रंग यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
सुस्तावलेले प्रशासन
या भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या मिठाईमुळे नागरिकांना पोटाचे विकार, विषबाधा व इतर गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, शहरात हा भेसळीचा काळाबाजार इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सणांच्या काळात तपासणी मोहीम राबवून अशा दुकानांवर धडक कारवाई करणे आवश्यक असताना, प्रशासनाच्या या सुस्तावलेल्या कारभारामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाडस अधिकच वाढले आहे. अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ झोपेतून जागे होऊन शहरातील लहान-मोठ्या सर्व मिठाई दुकानांची, कारखान्यांची आणि पिठीसाखर, खोबरा कीस विक्री दुकानांची कसून तपासणी करावी. भेसळयुक्त साहित्याचा साठा जप्त करून दोषी व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.

गणपतीच्या मोदकांमध्ये भेसळीचा धोका!
गणेशोत्सवात गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र, वाढती मागणी लक्षात घेता काही ठिकाणी मोदकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे खोबरे, कृत्रिम रंग, खराब दर्जाची साखर तसेच बनावट किंवा कालबाह्य पदार्थांचा वापर होण्याची शक्यता असते. अशा भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोदक खरेदी करताना स्वच्छता, ताजेपणा, पदार्थांची गुणवत्ता आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासणे गरजेचे आहे. प्रशासनानेही मिठाई विक्रेत्यांची नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








