Nashik News: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसरात साधुग्राम उभारणीसाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. मात्र, या निर्णयामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असून, आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती अव्यक्त होता आहे. त्याअनुषंगाने त्र्यंबक परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा सोहळा आहे. त्याचे नियोजन करताना भाविकांच्या सुविधांसोबतच स्थानिक शेतकऱ्यांचे हित जपणेही तितकेच आवश्यक आहे. कुंभमेळ्याचा विकासाठी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा बळी दिला जाऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनातील विषयांची गांभीयाने दखल घेऊन संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात व त्र्यंबक परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कल्पेश कदम, पुरुषोतम कडलग, रविंद्र वारुणसे, कैलास चोखे, उमेश सोनवणे, सागर वऱ्हाळे, राकेश वऱ्हाळे आदिंनी केली.

त्र्यंबकेश्वरच्या शेतकरी- नागरिकांच्या निवेदनाचा आशय असा
- साधुग्रामसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण टाळावे. साधुग्राम उभारणीसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित केल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा विचार करून पर्यायी जागेचा शोध घेण्यात यावा.
- त्र्यंबकेश्वर परिसरातील मंजूर NA लेआउटमधील प्लॉटधारकांच्या जमिनी साधुग्रामसाठी प्रस्तावित क्षेत्रातून वगळण्याचा प्राधान्याने विचार करावा.
- शेतजमिनी कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका टाळावा. साधुग्रामसाठी शेतजमिनींवर खडी, मुरूम व इतर साहित्य टाकल्यास जमिनीची मूळ सुपीकता पुन्हा प्राप्त करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे तात्पुरत्या वापराच्या नावाखाली शेतजमिनींचे कायमस्वरूपी नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- त्र्यंबकेश्वरच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य द्यावे. त्र्यंबकेश्वर शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करता, तीन बाजूंनी डोंगररांगा असलेल्या या परिसरात उपलब्ध जमिनींचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी सुरक्षित राहिल्यास भविष्यात शेतीसोबतच नियोजनबद्ध शहरी विकासालाही चालना मिळू शकेल.
- यापूर्वी बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. ग्रीन बेल्ट, ३० मीटर रस्ता आणि २४ मीटर रस्त्यांच्या नियोजनामुळे यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याबाबतही त्यांच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत साधुग्रामसाठी पुन्हा जमीन अधिग्रहित झाल्यास त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान अधिक गंभीर होणार आहे.
- त्र्यंबकेश्वर परिसरातील २०० पेक्षा अधिक बाधित होण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांच्या समस्या, हरकती व सूचना प्रत्यक्ष ऐकून घ्याव्यात. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पर्यायी जागेचा विचार करावा आणि त्यांच्या जमिनी, उपजीविका व भविष्यातील हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय्य निर्णय घ्यावा.








