Thane News: नागपूर मधील एक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या ऑटोचालक पतीची हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली होती. घटनेनंतर ही महिला दीड महिन्यापासून फरार होती. त्यांनतर पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नीला ठाणे पोलिसांनी अटक केली आणि पोलीस चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला. ठाणे पोलिसांनी आरोपी महिलेला नागपूरच्या बेल्टारोडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आठ महिन्यापूर्वीच या जोडप्याने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचे समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
दरम्यान महाराष्ट्रातील नागपूर येथे ऑटोचालकाच्या हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी नागपूरमध्ये आपल्या पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली महिलेला अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दीपाली उर्फ बाली विजय साळुंके अशी ओळख असलेली २९ वर्षीय आरोपी महिला कथितरित्या विवाहबाह्य संबंध ठेवत होती. यामुळे तिचा पती गौरव रागडे (२७) याच्यासोबत तिचे वारंवार खटके उडत होते. गौरव नागपूरच्या अजनी परिसरात ऑटो-रिक्षा चालवत असे, ऑगस्ट महिन्यातील घटनेच्या सुमारे आठ महिने आधी या जोडप्याने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.
महिलेचे विवाहबाह्य संबंध?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रागडेला दीपाली आणि ऋषिकेश खोडे यांच्या कथित संबंधांबद्दल लग्नानंतर लगेचच समजले आणि तेव्हापासूनच त्या दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. नंतर ती महिला पतीचे घर सोडून वेगळी राहू लागली. २० ऑगस्ट रोजी दुपारी, रागडेने आपल्या वडिलांना सांगितले की तो दीपाली आणि खोडे यांच्यासोबतचा वाद मिटवण्यासाठी नागपूरच्या नरेंद्र नगरला जात आहे. त्यावेळी खोडे सुंदरबन लेआउटमध्ये दोन मित्रांसोबत दारू पीत होता. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रागडे आणि खोडे यांच्या गटात जोरदार वाद झाला.
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, दीपालीच्या चिथावणीवरून खोडे आणि त्याच्या मित्रांनी नरेंद्र नगरमधील नाल्याच्या पुलाजवळ रागडेवर चाकूने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता.

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर राहणारी ही आरोपी महिला त्यानंतर फरार झाली होती. पोलिसांनी सांगितले की, तिला शनिवारी येथे अटक करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान त्या महिलेने गुन्ह्यातील आपला सहभाग कबूल केला आहे. तिला नागपूरच्या बेल्टारोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, इतर आरोपींविषयी कोणतीही माहिती नसल्याचेही सांगितले.










