Mumbai News: निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, मतदार पात्रता यादी १ ऑक्टोबर २०२६ ही कायम ठेवण्यात आली आहे. (SIR) विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
मतदारांनी वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक तपासावी
विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांनी मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. नाव वगळले गेले किंवा नोंदींमध्ये काही चूक आढळली, तर नियमांनुसार संबंधित दावा किंवा हरकत दाखल करता येऊ शकते. त्यामुळे पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.









