Beed News: बीड गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारीपदी नेमणूक असलेल्या दत्तात्रय मुरलीधर चाटे व जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहाय्यक शिक्षक जयगुरु शिवाजी गिरी यांना मुख्यध्यापकाकडून २० हजारांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतलं. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
मिळालेली माहिती अशी की, बीडच्या केज येथील शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय-57 रा. केज जि. बीड ) व केज तांदळेवस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेचे सहा. शिक्षक जयगुरु शिवाजी गिरी (वय-50 वर्ष ) अशी दोन्ही लोकसेवक अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार हे उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असून ऑगस्ट 2026 मध्ये 2.0 शालार्थ वेतनप्राणालो ऑनलाइन देयकामध्ये अनियमितता केल्याबद्दल गट शिक्षण अधिकारी केज यांनी चौकशी सुरू करुन चौकशी अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांची नेमणूक केली होती. चौकशी अधिकारी दत्तात्रय चाटे यांनी चौकशीचा अहवाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अखेर २० हजार लाच देण्याचे ठरले.
अशी केली कारवाई
यातील तक्रारदार हे उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असून त्यांना ऑगस्ट २०२६ मध्ये गट शिक्षण अधिकारी केज यांनी २.० शालार्थ वेतनप्राणाली ऑनलाइन देयकामध्ये अनियमितता केल्याबद्दल नोटीस देऊन चौकशी अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांची नेमणूक केली होती. या चौकशी संदर्भात तक्रारदार हे चौकशी अधिकारी दत्तात्रय चाटे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन दि.०९ ऑक्टोबर २०२६ रोजी भेटले असता चौकशी अधिकारी चाटे, यांनी या चौकशीचा अहवाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी ४० हजार रु. लाचेची मागणी केली. अशा आशयाची लेखी तक्रार तक्रारदार यांनी दि.१४ ऑक्टोबर रोजी जालना लाचलुचपत विभागाकडे केली.
सहा. शिक्षकाच्या माध्यमातून घेतली लाच
दरम्यान या तक्रारीची दखल घेऊन सापळा रचला. १४ ऑक्टोबर रोजी तक्रारदार व पंचासह केज गट शिक्षण अधिकारी कार्यालय येथे जाऊन दत्तात्रय चाटे व तक्रारदार यांची भेट झाली. त्याकामासाठी चाटे यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजार रू. लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १४ ऑक्टोबर रोजी १५:४० वाजता गट शिक्षण अधिकारी कार्यालय केज येथे आरोपी क्र. १) दत्तात्रय चाटे यांचे सांगणेवरून लोकसेवक क्र. २) जयगुरू गिरी यांना तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष २० हजार रू लाच स्वीकारतांना रकमेसह ताब्यात घेतले. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिगारे, जालन्याचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गजानन घायवट, मनोहर भुतेकर, गणेश चेके, विठ्ठल कापसे आदीच्या पथकाने केली.










