Jalgaon News: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पावसाचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान हवामान कोरडे राहिल असा अंदाज होता. आज पुन्हा १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील मात्र, कुलाबा हवामान विभागाने जळगावला कोणताच इशारा दिलेला नाही. हवामान कोरडे राहणार असल्याने जळगावमध्ये सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसवर पोहचले आहे. त्याने वातावरणात उकाडा जाणवत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप पिके संकटात सापडली आहे.
खरीप हंगाम हातचा गेला
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२६ दरम्यान दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिके मोठ्या प्रमाणावर सुकली किंवा करपली आहेत. कापूस, मका, सोयाबीन उडीद, मूग, ज्वारी, आणि भुईमुग ही हातातून गेले आहे. दरम्यान पाचोरा, चोपडा, भुसावळ, यावल आदी भागात भागांत जवळपास एक ते दीड महिना जोरदार पाऊस न झाल्याने पिकांना फटका बसला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असले तरी, करपलेल्या खरीप पिकांना त्याचा फारसा फायदा झालेला नाही. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप ही जोरदार पावसाची प्रतीक्षा राहिल.

पुढील काही दिवस हवामान कोरडे
त्यातच राज्यातही अशीच परिस्थिती आहे. १८ सप्टेंबर रोजी कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, याठिकाणी देखील कोणताच इशारा नाही. १९ व २० सप्टेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी; तसेच कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. कुलाबा वेधशाळेने १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरदरम्यान कोणताही इशारा दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.








