Latest Weather Update: उत्तर महाराष्ट्रात नाशिक सोडले तर जळगाव धुळे, नांदुरबार आणि अहिल्यानगर येथे दमदार पावसाची अद्याप ही आवश्यकता आहे. जळगावमध्ये सातत्यपूर्ण पाऊस नसल्याने खरिपाची पिके संकटात आहेत. उद्या १२ सप्टेंबर रोजी नंदुरबार वगळता जळगाव, धुळे, नाशिक आणि अहिल्यानगरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजच्या अंदाजाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांना पाण्याची गरज असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अन्यथा पिके हातची जाण्याची शक्यता आहे.
जळगाचे तापमान कमाल ३४ अंशावर
पाऊस किंवा गडगडाटाच्या एक किंवा दोन सरींसह अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. जळगावचे तापमान सातत्याने ३३ ते ३४ अंश सेल्सियस दरम्यान आहे. आज ३४ अंश सेल्सियस आहे. पावसाने दडी मारल्याने गेल्या १५ दिवसापासून उकाडा जाणवत आहे. सकाळी कडक ऊनामूळे पडत असल्याने वातावरणात उष्णता जाणवते. दिवसभर ऊन सावलीचा खळे सुरू असतो. त्यामुळे जळगावमध्ये जोरदार पावसाची आवश्यकता असून १२ व १३ सप्टेंबरला वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे.

मुंबई वेधशाळेचा अंदाज
मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. १२ सप्टेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाअभावी खरिपाची पिके करपली आहे. धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी पाण्याअभावी पिके सुकल्याचे समोर आले आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.
उद्या ‘या’ ३१ जिल्ह्यांना वादळी पाऊस
१२ सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता कुलाबा हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.










