Jalgaon News: जळगावात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २५ दिवसांनंतर पावसाचे आगमन झाल्यानं जळगावकर सुखावले आहे. गेल्या २४ तासात जळगावात ४२ मिमी इतका पाऊस झाला आहे. रात्रभर पाऊस धो-धो कोसळत होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आज देखील दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहणार आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
मुंबईकर सावधान
दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. नाशिक तसेच घाटमाथ्याचा परिसर सोडला तर राज्यातील बहुसंख्य भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी, शेतीसाठी पावसाची आवश्यकता असल्याने राज्यातील काही भागात दुष्काळाचे सावट आहे. आज पालघर, ठाणे आणि मुंबईला अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
रविवारी या २८ ठिकाणी मुसळधार
१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

सोमवारी घाटमाथ्याला येलो अलर्ट
१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागान केले आहे.









