Latest Weather News: जळगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढतोय, हवामान विभागाने उष्णतेचा अंदाज दिला आहे. ५ ते ११ अक्टोबर दरम्यान जळगाव जिल्ह्यात मुख्यतः आकाश निरभ्र राहणार आहे. आज सकाळी सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के असून हवामान दमट आणि उष्ण आहे. त्यामुळे वातावरणात दिवसभर उन्हाचे चटके सहन करावे लागतील. तसेच, पुढील काळात तापमान ३८ अंशावर जाण्याची इशारा ही दिला आहे. त्यामुळे जळगावकर तुम्ही बाहेर निघण्याचा बेत आखाताय तर, जरा जपून! पुढील काळ दमट आणि उष्ण हवामान तुमची परीक्षा बघणार आहे.
आजचे सार्वधिक तापमानाचे जिल्हे
मालेगाव गेल्या दोन दिवसांपासून तापत आहे. मालेगावचे तापमान सातत्याने ३८ अंशावर जात असल्याने मालेगावकर दमट आणि उष्ण वातावरणामुळे हैराण झाले आहे. राज्यात मालेगावनंतर जळगावमध्ये ३७.५ अंश तापमान नोंदवले गेले आहे. तसेच सोलापूर ३७.४ व अकोला ३७.४, छत्रपती संभाजीनगर ३७.२, तसेच विसर्भातील वर्धा ३७ अंश, यवतमाळ ३६.४, बुलढाणा- वाशीम ३६ अंश सेल्सियस उष्ण तापमान नोंदवले गेलं आहे, आणखी पुढील काही दिवसात ऑक्टोबर हिटचा दणका सहन करावा लागणार आहे.
५ ते ८ ऑक्टबर हवामान कोरडे
कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची दाट शक्यता आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील ५ ते ८ ऑक्टबरला बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. असा अंदाज प्रादेशिक कुलाबा हवामान केंद्राने वर्तविला आहे.

हवामान विभागाचा इशारा
- ०६ ऑक्टोबरला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची दाट शक्यता आहे.
- ०७ ऑक्टोबरला विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची दाट शक्यता आहे.
- ०८-०९ ऑक्टोबरला कोणताही इशारा नाही.
नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास
नैऋत्य मोसमी वाऱ्याची माघार सुरू झाली आहे. रेषा पूर्वमध्ये सुपौल, रांची, रायपूर, ब्रम्हपुरी, परभणी, बारामती, हरनाई या भागातून जात असून पुढील दोन ते तीन दिवसात मराठवाडा आणि विदर्भ या भागातून जाणार आहे. मान्सूनचा माघारी परतीचा प्रवास सुरू होईल. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या भागांतून तसेच तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकाच्या भागातून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीची परिस्थिती अनुकूल आहे.








