TET Paper Leak: नीट पेपर फुटीप्रकरण ताजे असतांनाच आत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याने पालक विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रभर १,०२८ केंद्रांवर २८ जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) होणार होती. मात्र, परीक्षेपूर्वीच काही प्रश्न फुटल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्तांनी एक पत्रक काढून पुढील परीक्षा कधी होईल याची माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
भिवंडीत पेपरफुटी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, २७ जूनच्या पहाटे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भिवंडीतील काही लोकांकडे (TET) परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणाहून जप्त केलेले साहित्य पडताळून पाहण्यासाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावले.
पडताळणीदरम्यान, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की जप्त केलेल्या कागदपत्रांमधील काही प्रश्न हे प्रत्यक्ष (TET) टीईटी २०२६ च्या प्रश्नपत्रिकेशी जुळणारे होते. ही बाब समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
(NEET) नीट २०२६ परीक्षेतील अनियमितता लक्षात घेऊन (TET) टीईटी परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या, असे परीक्षा परिषदेने सांगितले. तरीही, पेपरफुटीचा संशय समोर आल्यानंतर, भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, सविस्तर तपास आवश्यक असल्याने आणि परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतली जावी याची खात्री करण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. दरम्यान, पेपर कसा फुटला आणि या प्रकरणात आणखी काही लोक सामील आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

नीट युजी २०२६ च्या कथित पेपरफुटीच्या घटनेनंतर लगेचच घडलेल्या या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. यावर्षी (MAHA TET) टीईटीसाठी कार्यरत शिक्षकांसह ४.२८ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यामुळे पेपर १ आणि २ साठी एकूण सहा लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते.
परीक्षेची नवी तारीख कळविली जाणार
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत: तांबे
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत’ झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी (NEET, CBSE) मूल्यांकनातील गोंधळ, (UGC-NET) तसेच विविध प्रवेश आणि भरती परीक्षांमधील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला. या सर्व घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
(TET) टीईटी प्रकरण इतर परीक्षांपेक्षा अधिक गंभीर असल्याचे सांगताना तांबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे २० ते ३० वर्षे सेवा केलेले आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा देत आहेत. अशा वेळी पेपरफुटी होणे म्हणजे त्यांच्या नोकरीवर आणि कुटुंबाच्या भवितव्यावर घाला घालण्यासारखे आहे, असे म्हणाले.






