Chopda News: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजा, कार, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ₹६ लाख ८ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस कारवाईचे निर्देश
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अवैध अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी कारवाईचे निर्देश दिले होते.

हयुडाई सॅन्ट्रो कारची झडती
२६ जुलै रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लासूर–हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ सापळा रचला. संशयित हयुडाई सॅन्ट्रो (एमएच-१४-बीके-३११३) या कारची झडती घेतली असता त्यामध्ये ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी विष्णू सुभाष सुळे (रा. पिंपरी, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे व प्रशांत ताराचंद अथाणी (दोघेही रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिसांनी दिला इशारा
या कारवाईत १ लाख ७७ हजार ९०० रु. किमतीचा गांजा, ३ लाखांची कार, ९० हजारांची पल्सर मोटारसायकल आणि ४१ हजार रु. किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा जळगाव जिल्हा पोलिसांनी दिला आहे.








