Raj Thackray Statement: नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. महायुतीचे मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेवर केलेल्या टीकेनंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या कारभाऱ्यांवर टीका केली आहे. गुजरातच्या ठेकेदारांना कामे दिल्याने नाशिकमध्ये खड्डे पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमची सत्ता असतांना नाशिक सुंदर होतं. पण आम्ही केलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले गेले, असे ही ठाकरे यांनी सांगितले. त्यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. तुम्ही नाशिक एवढे सुंदर केले तर, मग तुमचा एक तरी नगरसेवक निवडून का आला नाही? सर्व कसे पडले? असा सवाल करून नाशिकच्या ठेकेदाराची यादी पाठवतो. त्यात एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा, असे प्रति आव्हान महाजन यांनी ठाकरे यांना दिल्याने नाशिकच्या खड्ड्यांवरून दोन्ही नेत्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे. त्यावर राज ठाकरे यांची पुढील काळात काय प्रतिक्रिया येते हे बघावे औत्सुक्याचे ठरेल.
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर पक्षासाठी आपली संकटमोचक भूमिका निभवतांना गिरीश महाजन दिसत आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधतांना मंत्री महाजन म्हणाले, नाशिककरांनी आपले सरकार पाहिले आहे,.तुमचे महापौर पाहिले, तुमचा कार्यकाळ संपल्यावर नाशिककरांनीं एकही नगरसेवक का निवडून दिला नाही. असे सांगून तुम्ही एवढे सुंदर नाशिक केले होते. तर, लोकांनी तुमच्या विरोधात निकाल का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचे उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केले नाही. नाशिक सुंदर केले तर मग तुमचे दोन चार नगरसेवक तरी निवडून आले असते. पण कुणालाच निवडून दिले नाही. तुम्ही काय केले हे सर्व लोकांना माहीत आहे, असा टोमणा मंत्री महाजन यांनी लगावला.

..तर खड्डा पडणार नाही
नाशिकच्या रस्त्यांबाबत बोलतांना महाजन म्हणाले की, नाशिक शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहोत. पुढचे ३५ ते ४० वर्ष खड्डा पडणार नाही, याची काळजी घेऊ, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने त्रास होणार आहे, हे आधीच सांगितले आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. नाशिकमध्ये असतांना मी आढावा घेत होतो, असे महाजन म्हणाले.











