bhusawal News: भुसावळ तापी नदीच्या किनारी असलेल्या मंदिरांची दुरावस्था झाली असून, येथील मंदिरांचे छत केव्हाही कोसळून एखादी दुर्घटना होऊ शकते. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मंदिरांची झालेली दुरावस्था बघून भाविकांनी नाराजी दर्शविली आहे. मंदिरांची डागडुजी करून सुधारणा करण्याची मागणी भाविकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
दरम्यान भुसावळच्या सर्व संबंधित अधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी तापी नदीवरील सप्तऋषी, अष्टविनायक मंदिर आणि महादेवाची पिंड या मंदिरांच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांच्या बांधकामाची स्थिती बिकट असून त्यांनी नाराजी दर्शविली आहे. येथील मंदिरांचे स्लॅबचे सिमेंट निखळले आहे. त्याकडे भाविकांनी लक्ष वेधले आहे.

मंदिरे जीर्ण झाली असून छत देखील कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्लॅबचे सिमेंट निखळून खाली पडले असून लोखंडी गज दिसत आहे. उर्वरित बांधकाम केव्हाही कोसळू शकते, अशी परिस्थिती आहे. मंदिराच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे. मंदिरांची तात्काळ दुरुस्ती हाती घेऊन सुधारणा करावी, अशी अपेक्षा आज तेथे दर्शनाला आलेल्या सर्व महिला भाविकांनी व्यक्त केली.
आजूबाजूच्या परिसरात झाडेझुडपे वाढले असून परिसरात गवत वाढल्याचे दिसून येत आहे. मंदिराच्या पायऱ्या तुटल्या आहे. श्रद्धेने येथे येणाऱ्या भाविकांचा भ्रमनिरास होत आहे. लोकप्रतिनिधींनी मंदिरांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.








