होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धरणगावला रेल्वे सुविधांच्या नव्या आशा पल्लवित; उधना-पुणे नवीन गाडीची घोषणा!

On: September 16, 2026 12:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Darangaon News: खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषतः धरणगावकरांसाठी रेल्वे सुविधांच्या दृष्टीने आशादायी घडामोड घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या बैठकीत धरणगावसह खान्देशातील रेल्वे प्रश्नांचा सविस्तर पाढा मांडण्यात आला. दरम्यान, उधना-पुणे व्हाया नंदुरबार, शिंदखेडा, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, मनमाड अशी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी केल्याने धरणगावच्या रेल्वे विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई येथे ११ सप्टेंबर रोजी झालेल्या झेडआरयूसीसी बैठकीत खान्देशातील रेल्वे प्रवाशांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. झेडआरयूसीसी सदस्य प्रतीक जैन यांनी धरणगावसह खान्देशातील प्रवाशांच्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या.

धरणगावच्या रेल्वे प्रश्नांवर विशेष भर

धरणगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधांचा विचार करता अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत. बैठकीत ताप्ती गंगा व बरोनी एक्स्प्रेसला धरणगाव येथे थांबा, तसेच हॉलिडे एक्स्प्रेस आणि चेन्नई-भगत की कोठी एक्स्प्रेसला धरणगाव येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय धरणगाव स्थानकावर मालधक्का व आरपीएफ आउटपोस्ट सुरू करणे, तसेच अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देणे, प्रवाशांसाठी, स्वच्छता आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही मागण्या मांडण्यात आल्या.

उधना-पुणे गाडीमुळे धरणगावला फायदा

उधना-पुणे नवीन रेल्वेगाडी सुरू झाल्यास धरणगाव, अमळनेर, जळगाव परिसरातील प्रवाशांना पुणे तसेच दक्षिण गुजरातशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क मिळणार आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि विविध कामांसाठी पुणे व सुरत परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

इतर मागण्यांनाही चालना

बैठकीत सुरत-भुसावळ पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करणे, सुरत-अमरावती एक्स्प्रेस सातही दिवस सुरू करणे, प्रेरणा एक्स्प्रेसला अमळनेर येथे थांबा देणे, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस सुरतपर्यंत वाढविणे, १९००३/०४ खान्देश एक्स्प्रेसला एलएचबी कोच देणे आणि ०९०४९/५० भुसावळ-दादर गाडी कायमस्वरूपी सुरू करणे आदी मागण्याही मांडण्यात आल्या. यामुळे धरणगावसह संपूर्ण खान्देशातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना आता प्रशासनाच्या पातळीवर चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

खा. स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश

उधना-पुणे नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या घोषणेमुळे धरणगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या असून, आता घोषणेची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. बैठकीस पश्चिम रेल्वेचे डिजीएम उज्ज्वल देव, पिसिसीएम तरुण जैन, पीसीओएम व्ही. ए. मालेगावकर, सीपीआरओ विनीत अभिषेक, आयजी अजय सदानी यांच्यासह विविध राज्यांतील सदस्य, खासदार, आमदार व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धरणगावच्या रेल्वे सुविधांना मिळणार गती?

उधना-पुणे गाडीची घोषणा आणि धरणगावसाठी मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांमुळे धरणगाव रेल्वे स्थानकाच्या विकासाच्या अपेक्षांना आता नवी पालवी फुटली आहे. प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या थांब्यांसह मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागल्यास धरणगाव हे खान्देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून आणखी सक्षम होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment