Spinny 3000 Crore IPO: गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या स्पिनी कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओसाठी लवकरच येणार आहे. कंपनीने या संदर्भात सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल केली आहेत. स्पिनी हा वापरलेल्या चारचाकी गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.
स्पिनीने आयपीओच्या माध्यमातून भाधारकांकडून ऑफर फॉर सेल आणि नवीन भांडवल उभारणार आहे. यासाठी कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी आणि 360 वन वॅम यांची ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती केली आहे. या घडामोडींशी संबंधित वृत्त मनीकंट्रोल या संकेतस्थळाने दिले आहे.
कपंनीचा 2027 मध्ये आयपीओ आणण्याचा विचार आहे. पण, या आयपीओची कालमर्यादा अजून निश्चित झाली नसून, ती सेबीच्या मंजुरीवर अवलंबून असेल. याचबरोबर सेबीकडून मिळणाऱ्या मंजुरीदरम्यान या आयपीओचा अंतिम आकार आणि रचना यामध्ये बदल होऊ शकतो.
सचिन आणि स्पिनी
नीरज सिंग, मोहित गुप्ता आणि रामंशु महाौर यांनी 2015 साली स्पिनीची स्थापना केली. ही कंपनी वापरलेल्या चारचाकी गाड्यांची आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी-विक्री, फायनान्सिंग, विमा आणि विक्री-पश्चात सेवांचा समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2021 मध्ये स्पिनीमध्ये गुंतवणूक केली होती. तसेच तो या कंपनीत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सहभागी झाला होता.











