Food And Drug Administration: राज्यात अन्न भेसळ विरोधात एफडीएचे धडाकेबाज कारवाई सुरूच आहे. अन्न भेसळ आणि अस्वच्छता असलेल्या आस्थापना दणका देण्याचे काम केलं जात आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १० आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्ट डार्क स्टोअरचा समावेश आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.
‘एफडीए’च्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान स्टोअरच्या हाताळणी विभागात एक जिवंत उंदीर आढळला. तसेच उंदरांनी १० किलोच्या तांदळाच्या अनेक पोत्यांना कुरतडले होते, आणि तांदूळ दूषित फरशीवर विखुरलेला होता. साठवणुकीच्या जागेतही उंदराच्या लेंड्या आढळल्या होत्या. तसेच खाद्यपदार्थांवर मोठ्या संख्येने झुरळे आढळली. अधिकाऱ्यांना फूड कार्टमध्ये जिवंत माश्या दिसून आल्या. एवढेच नव्हे तर रेफ्रिजरेशन युनिटमध्ये मेलेले कीटक, घाण आणि मोठ्या प्रमाणात गोठलेला बर्फही आढळला. यानंतर, एफडीएने स्टोअरचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने मालाडमधील सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट, ॲमेझॉनसाठी कार्यरत असलेल्या ॲक्युलॉजिक्स सप्लाय चेन सोल्युशन्सचे गोदाम, मोहम्मद अली रोडवरील सुलेमान उस्मान मिठाईवाला, जैन स्वीट अँड भेपुरी हाऊस एलएलपी आणि चेंबूरमधील नाईस एंटरप्रायझेस यांचे परवाने देखील निलंबित केले आहेत. सणासुदीच्या काळात, एफडीएने भेसळयुक्त आणि अस्वच्छ असल्याच्या संशयावरून राज्यभरातून १.३६ कोटी रुपयांचे खवा, मावा, पेडा, तूप, तेल, बर्फी, सुकवलेले जर्दाळू-मनुका, गूळ, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. मिरजमधून ६.५३ लाख रुपये किमतीची १,८६८ किलो हळद पावडरही जप्त करण्यात आली.









