Jalgaon News: संपूर्ण तालुकाभरातील शेतकऱ्यांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे युवासेनेच्या स्वप्निल सोनवणे यांनी मांडलेल्या शेतकरी प्रश्नांवर निवेदन स्वीकारताना ‘पंचनामे सरसकटच होतील’, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर महसूलमंत्री यांनी लगेचच झालेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी ग्वाही दिली असून आता पंचनामा करताना शेतात उभे पीक नसले तरी पंचनाम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतीत दैनिक शौर्य मराठीने प्रसिद्धी देत विशेष पाठपुरावा केला होता.
व्यावहारिक अडचणीकडे लक्ष वेधले
जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतर्फे युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन देत केली होती. महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात स्वप्निल सोनवणे यांनी प्रशासकीय पंचनाम्यांमधील एका महत्त्वाच्या व्यावहारिक अडचणीकडे लक्ष वेधले होते. नुकसान झाल्यानंतर शेतकरी शेत रिकामे न ठेवता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या पिकाची लागवड करतो. मात्र, आता महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पाहणीसाठी गेल्यास शेतात पूर्वीचे नुकसानग्रस्त पीक दिसत नाही. त्यामुळे “सध्या शेतात दुसरे पीक आहे म्हणजे मागील पिकाचे नुकसान झालेच नाही”, असा चुकीचा निष्कर्ष काढून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाण्याची भीती व्यक्त होत होती. यावर महसूल मंत्री यांनी विशेष लक्ष देत शेतकऱ्यांना दिलासा देणारे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.
पीक काढून टाकले तरी शेतकऱ्यांचे पंचनामे
युवासेनेच्या पाठपुराव्यानंतर ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध असून पीक काढून टाकले असले तरी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येतील. मदतीसाठी उभ्या पिकांचे फोटो, गुगल इमेज किंवा इतर तांत्रिक अटींची आवश्यकता नसून अशा सर्व शेतांचे थेट पंचनामे केले जातील, कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, केंद्र शासनाकडून मदत मिळविण्यासाठी अचूक पंचनामे आवश्यक आहेत. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांना दिलासा
अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीन, मका यांसारखी पिके आधीच काढून टाकली असली तरी त्यांचे नुकसान नोंदविले जाईल. दुष्काळी मदतीसाठी सर्वच शेतकऱ्यांचे स्वतंत्र पंचनामे करणे आवश्यक नसून किमान १० टक्के पंचनाम्यांच्या आधारेही मदतीची प्रक्रिया राबविता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून युवासेनेने महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह राज्य सरकार यांचे समस्त शेतकरी वर्गातर्फे आभार व्यक्त केले. तसेच याबाबतीत वारंवार दखल घेतल्यामुळे ‘शौर्य मराठी’चेही विशेष आभार व्यक्त केले.









