Nandurbar News: नवापूर येथे हा प्रकार उघडकीस आला असून 50 हजारांची लाच स्वीकारताना नंदुरबार वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी संदीप देवराम पाटील (45, हंगामी रा. इंदिरा संकुलामागे,नंदुरबार, मूळ रा.साने गुरुजी कॉलनी, जळगाव) व राज्य कर निरीक्षक विवेक विश्वनाथ घोडके (विहार कॉलनी, नंदुरबार) यांना नाशिक एसीबीने आज सायंकाळी सापळा रचून नवापूर शहरातील हॉटेलात ५० हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे लाच खोरांचे धाबे दणाणले आहे.
नेमकं प्रकरण काय
दरम्यान तक्रारदाराच्या मालकीचा स्टील व सिमेंटचा व्यवसाय असून ते जीएसटीचा नियमित भरणा करतात. तक्रारदाराला 2022-23 या आर्थिक वर्षाच्या जीएसटी विवरणपत्राच्या पडताळणीदरम्यान काही त्रृटी आढळल्याने नंदुरबार जीएसटी कार्यालयाकडून दोन नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटीसांचे उत्तर त्यांनी त्यांच्या सीएमार्फत पाठवले होते. त्यानंतर सन 2022-23 व सन 2023-24 या आर्थिक वर्षांच्या जीएसटी वार्षिक विवरणपत्रांमध्ये त्रृटी असल्याचे कारण देत पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वरील नोटीसा व कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्याच्या मोबदल्यात राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांनी एक लाख लाचेची मागणी केली होती. त्याबाबत गुरुवारी तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. तसेच सापळा रचण्यात आला.

हॉटेलमध्ये स्वीकारली लाच
तसेच तक्रादाराला आरोपींनी नवापूर शहरातील सुरत-धुळे महामार्गावरील हॉटेल उर्विशा येथे बोलावून घेतले. लाच देण्यासाठी बोलावल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून आरोपींनी लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने आरोपींना अटक केली. आरोपींविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदेयांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश निंबाळकर, हवालदार नितीन नेटारे आदींच्या पथकाने यशस्वी केला. सापळ्याचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले.









