Dhule News: राज्यात कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत डोक्यावरील थकीत कर्जाचे ओझे हलके होणे, ही शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे. याच दिशेने राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीत जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक या विभागातील किती शेतकऱ्यांच्या समावेश आहे. याची माहिती राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
पालकमंत्री रावल यांनी सांगितले की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती करताना निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच आर्थिक संकटांनाही त्याला सामोरे जावे लागते. अशा वेळी थकीत कर्जातून दिलासा मिळाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामाचे नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येईल. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांच्या शेतीला आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला बळ देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ
राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने व्हावी, यासाठी महाआयटीच्या माध्यमातून ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती या प्रणालीवर अपलोड केली आहे.
24.67 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
या योजनेअंतर्गत 24 जुलै 2026 रोजी 16.96 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 11 सप्टेंबर 2026 रोजी 4.20 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी, तर आज 12 ऑक्टोबर 2026 रोजी 3 लाख 51 हजार 192 पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यातील एकूण 24.67 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नाशिक विभागात 14,244 शेतकरी
नाशिक विभागातील तिसऱ्या यादीत एकूण 14,244 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील 2,919, नाशिक जिल्ह्यातील 3,811, अहिल्यानगर जिल्ह्यातील 4,415, जळगाव जिल्ह्यातील 1,756 आणि नंदुरबार जिल्ह्यातील 1,343 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आधार प्रमाणीकरणानंतर रक्कम जमा होणार
पालकमंत्री रावल यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीतील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची 31 मार्च 2026 रोजीची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे.
या यादीतील शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आणि इतर खर्चही माफ करण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही पात्र शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या हेअरकट धोरणानुसार संबंधित संपूर्ण कर्ज निरंक करण्यात येणार आहे.
वयोवृद्ध अन् मयत लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था
आधार प्रमाणीकरण करताना वयोवृद्ध शेतकरी किंवा बोटांचे ठसे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, तसेच मयत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्येही कर्जमुक्तीची कार्यवाही करता येणार आहे.
धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांची यादी
धुळे जिल्ह्यातील तिसऱ्या यादीत समाविष्ट 2,919 शेतकऱ्यांनी आपले नाव संबंधित बँक, विकास संस्था किंवा ग्रामपंचायतीत तपासावे. कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. पात्र, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणे महत्त्वाचे असून, कोणत्याही लाभार्थ्याने आवश्यक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.









