Mumbai News: राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत दिवाळी आधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना अॅडवान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आली आहे. आता एकूण 305 तालुके दुष्कळग्रस्त म्हणून घोषित झाले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता आपण दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळाबाबत जीआर ऑक्टोबर महिन्यात काढला. आम्हाला कल्पना आहे दिवाळी येते आहे, दिवाळी अडचणीची आहे. दुष्काळाची कार्यप्रणाली दिवाळीआधी पूर्ण होणं कठीण आहे. दिवाळीआधी सगळी कामं होऊ शकत नाही. मात्र एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करता, आज मंत्रिमंडळाशी चर्चा करून दिवाळी आधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीआधी 5 हजार मदत मिळणार असून त्याचा फायदा सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकर्यांना मिळणार थेट खात्यात पैसे जमा होतील. ही अग्रीम मदत सुमारे 6000 कोटी रुपयांची असणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारनं घेतले महत्त्वाचे निर्णय
राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, आतापर्यंत 305 तालुके दुष्कळग्रस्त
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये अॅडव्हान्स देणार
मराठवाड्यात भूजल पातळी 3 मीटरने खालावली, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवणार
16 हजार अनधिकृत कनेक्शन कापले
शैक्षणिक फी माफीच्या जीआरमधून अटी-शर्ती हटवल्या
वीज बिलांसाठी कोणताही तकादा नाही, अतिउत्साह दाखवल्यास कारवाई
कर्जवसुलीसाठीही बँकांनी अतिउत्साह दाखवू नये, खासगी बँका, मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा करणार
शेतकऱ्यांनी चारा किंवा चारा लागवड पीकं घ्यावीत, राज्य सरकार तो विकत घेणार
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांना मौजे गिरडा ( ता. व जि. बुलढाणा) येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी. संस्थानाला यापुर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर. जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर बांधकाम करता येणार. यामुळे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क )
शेतकऱ्यांमध्ये नाराजी, मदत तुटपुंजी!
मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी दर्शविली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली 5 हजार रुपयांची मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसान मोठं असताना मदत मात्र तुटपुंजी मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पिकांच्या नुकसानीचा विचार करून सरकारने अधिक आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.










