Ketan Agarwal Death Case : संपुर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील लोहगड येथे झालेल्या या हत्याप्रकरणात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सियासह तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटकही केली असून तब्बल 5,053 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केले आहे. याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
आधी अपघात आणि नंतर खून झाल्याचा धक्कादायक प्रकार या प्रकरणात समोर आला आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मयत केतन याच्या परिवाराकडून करण्यात येत होती. त्यानुसार, आता या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आल्याची माहिती केतनच्या वडिलांनी दिली.

त्यामुळे या खटल्याच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि खटल्याची प्रभावीपणे बाजू मांडली जावी, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त करत आणि आपल्या मुलाला न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्याचे सांगत अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणाला कायदेशीर स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
असा आहे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम
- 25 मे: सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालला ‘एलिमिनेट’ (हत्या) करायचे ठरवले.
- 31 मे: 31 मे रोजी सिया आणि केतन पहिल्यांदा लोहगडावर गेले. तिथे सियाने रेकी करून हत्येसाठी योग्य जागेची (स्पॉट) निवड केली.
- 6 जूनचा बाली प्लॅन रद्द: 6 जूनला केतन आणि सिया बालीला जाणार होते, परंतु तिथे एकत्र राहावे लागेल म्हणून 4 जूनलाच हत्येचा प्लॅन आखला गेला. घरच्यांनी ऐनवेळी विरोध केल्याने तो प्लॅन रद्द झाला. त्यानंतर मुंबई एअरपोर्टला जाताना फुड मॉलवर गाडी थांबल्यावर सियाने केतनचा पासपोर्ट चोरून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला, ज्यामुळे बालीचा दौरा रद्द झाला.
- 14 जून आणि 19 जूनचा बर्थडे प्लॅन: 19 जूनला सियाच्या वाढदिवसासाठी महाबळेश्वर येथे रिसॉर्ट बुक होते. त्याआधी 14 जूनला लोहगडावर हत्या करण्याचा प्रयत्न झाला पण तो एक्झिक्युट झाला नाही.










