Jalgaon Zilla Parishad News : दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आणखी पाच कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. यापूर्वी ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे आता निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १३ झाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे
भास्कर रामदास चिमणकर (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती यावल), विनोद शांताराम बोधरे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती चोपडा), शांताराम उखडू तायडे (वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती यावल), दिनेश लक्ष्मण नन्नवरे (कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग), पारसमणी काशीराम मोर (कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती अमळनेर).
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या यूआयडी कार्डची सखोल तपासणी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रातील टक्केवारी आणि प्रत्यक्ष तपासणीतील निकष यात तफावत आढळली, त्यांच्यावर प्रशासनाने निलंबनाचे पाऊल उचलले आहे.
प्रशासनाचा इशारा
दिव्यांग सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत सुरू असलेली ही तपासणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रात दोष आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.








