Jalgaon News: पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची जन्मभूमी जळगाव असली, तरी २६/११च्या ऐतिहासिक खटल्यामुळे मुंबई ही त्यांची प्रमुख कर्मभूमी ठरली. या खटल्यातील अनेक गुपिते आणि सर्वसामान्यांना माहिती नसलेले प्रसंग ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, दहशतवादी पाकिस्तनाचा खरा चेहरा पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी जगासमोर आणला, असे मत पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव ॲड. अनिकेत निकम यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या चित्रपटात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अनेक प्रसंग दाखविण्यात आले आहे. यासह ॲड.उज्ज्वल निकम यांच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक वादळे देखील दाखविण्यात आली आहे. सुरक्षेसाठी त्यांना मुला-मुलींच्या महत्त्वाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे लागले. या काळात त्यांच्या पत्नीने कुटुंबाला खंबीरपणे सावरले, तर सुपुत्राने या खटल्यात मदतनीस म्हणून मोलाची भूमिका बजावल्याचे देखील या चित्रपटात दाखविण्यात आले.

चित्रपटात आरोपी कसाबने वेळोवेळी स्वतःचा जबाब बदलवून खटला भरकटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ॲड. निकम यांनी अत्यंत बारकाईने पुरावे गोळा करत कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवले. शिवाय कसाबच्या माध्यमातून पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले. निकम यांच्या संघर्षाची ही गाथा प्रहार चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. त्याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठी कलाकारांचा सहभाग
‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि अजिंक्य देव यांसारखे नामवंत मराठी कलाकार आहेत. त्यामुळे, मूळ हिंदी संवादांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी संवाद पाहायला मिळतो. तसेच अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन जळगावात पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळातर्फे रविवारी करण्यात आले होते. पत्रकारांसाठी हा विशेष शो होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र ॲड. अनिकेत निकम यांनी चित्रपटाची पार्श्वभूमी विशद करत उपस्थितांचे स्वागत केले. प्रसंगी पत्रकार मोठ्या संख्यने उपस्थित होते.









