Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आज शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानातील उस्मान अशी झाली, जो जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
गुप्तचर माहितीनुसार, आज शुक्रवारी (दि. २३ जानेवारी) सुरक्षा दलांनी कठुआच्या परहेतर भागात संयुक्त कारवाई सुरू केली. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. सध्या शोध मोहीम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनुसार समोर येत आहे.
धनू पारोलच्या जंगलात चकमक
जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बिल्लावार येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांना या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे शोध मोहीम सुरू झाली.
सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध केलेली २०२६ मधील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा कठुआ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना दिसला. लष्कराने ड्रोनविरोधी यंत्रणा सक्रिय करून प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या देखरेखीदरम्यान हा ड्रोन दिसला. १० दिवसांत अशी ही पाचवी घटना होती. १७ जानेवारी रोजी संध्याकाळी रामगड सेक्टरमध्ये हा ड्रोन दिसला, अशी दलाच्या सूत्रांनी दिली.










