Parbhani ZP Election Results : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना परभणीकरांनी दुसरा मोठा धक्का दिला आहे. मुलीनंतर आता मुलगा समशेर वरपूडकर यांचाही शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून पराभव झाला असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत सुरेश वरपूडकरांच्या कुटुंबातून एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, त्यापैकी केवळ एका जागेवरच विजय मिळवण्यात वरपूडकर कुटुंबाला यश आले.
समशेर वरपूडकर यांच्यासह मुलगी, सून आणि एका पुतण्यालाही मतदारांनी नाकारले असून, या निकालानंतर परभणीकरांनी घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकरांचा पराभव करत स्पष्ट बहुमताने विजय संपादन केला. विजयानंतर भावूक झालेल्या खिल्लारे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी परभणीकरांचे आभार मानत, “हा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या निकालानंतर परभणीकरांनी घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. जनतेने विकास, कामगिरी आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)










