Jalgaon News: जळगाव महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी दि. ३० मार्च रोजी विशेष सभेत स्वीकृत सदस्यांची घोषणा होणार असून, या आज त्याची यादी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. भाजपाकडून चार, शिवसेना शिंदे गट दोन, शिवसेना ठाकरे गटाकडूनही नावे देण्यात आले आहे. या अर्जाचे छाननी दि. २७ रोजी होणार आहे. या निवडीकडे आता सर्व जळगावकरांचे लक्ष लागून आहे.
जळगाव महापालिकेत मागील दाराने सदस्य होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडे स्वीकृत पदासाठी फिल्डिंग लावले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजपाकडून स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना देण्यात आली. भाजपच्या वतीने डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत.दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे वेगवेगळ्या स्तरावरून प्रस्ताव सादर करण्यात आले जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचा प्रस्ताव मांडला आहे.हा प्रस्ताव बाळासाहेब कंखरे, उमेश चौधरी यांनी आयुक्तांकडे सादर केला. गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचा प्रस्ताव दिला, त्यामुळे या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आयुक्तांना स्वीकृत सदस्यांसाठी दिलेल्या प्रस्तावावर दि. २७ रोजी छाननी होणार आहे. मनपा आयुक्तांच्या दालनात हे निवड करण्यात येणार आहे. शुक्रवारच्या अर्ज छाननी प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येऊन अंतिम घोषणा सोमवारी महासभेत करण्यात येणार आहे. आज प्रस्ताव सादर करताना शिंदे गट व भाजपचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये गटप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, भाजपचे दीपक सूर्यवंशी, दिलीप पोकळे, सागर सोनवणे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि गटनेते प्रकाश बलाणी यांचा समावेश होता. त्यामुळे ३० मार्च रोजी होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





