Ashok Kharat Case: एकीकडे इडी आणि आयकर विभागाने मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे, खरातच्या मालमत्ता शोधल्या जात आहे. तसेच एका गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज अशोक खरातला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खरात प्रकरण राज्यभर गाजत आहे, सुरक्षेच्या कारणास्तव खरातला आज ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले दरम्यान काही काळ तांत्रिक बिघाड झाल्याने सुनावणी थांबली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या गुन्ह्याचे गांभीर्य सांगितले, आरोपी स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगून महिलांना जाळ्यात ओढत होता. त्यांना तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढा खाण्यास देत असे, त्यात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे. त्या गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळत होता. आणि या भोंदूगिरीसाठी तो कोणत्या रत्नांचा वापर करत होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची देण्याची मागणी केली.
दरम्यान त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता, तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असे न्यायालयाला सांगितले. दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या प्रकरणात आज कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले होते. खरातवर १२ गुन्हे दाखल आहे, अशी माहिती यापूर्वीच एसआयटीने दिली होती.
तसेच अशोक खरातवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल आहे, त्यात अनेक महिलांवर अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. तसेच विधवा आणि विवाहित महिलांना ही त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे. तिसऱ्या गुन्हयात त्याला ५ दिवसांची कोठडीत सुनावल्याने या प्रकरणातील आणखी पाळेमुळे खोदून त्याचे कारनामे समोर आणून त्याचा पर्दाफाश करण्याचा ‘एसआयटी’चा प्रयत्न आहे.








