Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सुरूच असून आणखी एक कारवाई समोर आली आहे, नशिराबाद भागातील अवैध खोदकाम प्रकरणाची चौकशी बंद करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी आणि एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली. मिलींद प्रकाश देवरे (वय ३७), मंडळ अधिकारी, नशिराबाद भाग, जळगाव आणि सुरेंद्र प्रल्हाद अहिरे (वय ३९, रा. पिंप्राळा, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रामानंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या शेतात अवैधरित्या खोदकाम होत असल्याची तक्रार तहसील कार्यालयात केली होती. मात्र नंतर संबंधितांनी ती तक्रार मागे घेतली होती. तरीदेखील उपरोक्त अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी पंचांसमक्ष एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
मंगळवारी तलाठी कार्यालय, पिंप्राळा येथे खासगी इसम सुरेंद्र अहिरे याच्याकडे ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगण्यात आले होते. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ प्रफुल्ल माळी, विलास निकम आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत. पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी करण्याचे आवाहन केले असून टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधण्याचे सांगितले आहे.






