America Israel- Iran War: अमेरिकेत झालेल्या चर्चेनंतर, रविवारी संपलेल्या मुदतीनंतर इस्रायलसोबतचा युद्धविराम ४५ दिवसांसाठी वाढवण्याच्या कराराचे लेबनॉनने स्वागत केले आहे, मात्र दुसरीकडे इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील शहरे आणि गावांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी किमान १२ जण ठार झाले, ज्यात तीन पॅरामेडिक्सचा समावेश आहे. इराण युद्धाचा ७८ वा दिवस आहे, ट्रम्प आणि तेहरानकडून चर्चेचे संकेत मिळत असून इराणच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांनी चर्चेसाठी दारे खुली असल्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून कोंडी कायम आहे,
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ब्रिक्स बैठकीदरम्यान सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून तेहरानला एक पत्र मिळाले आहे, ज्यात युद्ध संपवण्यासाठी नवीन वाटाघाटींसाठी खुलेपणा दर्शवला आहे. तथापि, अराघची म्हणाले की, इराणच्या समृद्ध आण्विक सामग्रीच्या मुद्द्यावर “कोंडी” कायम आहे, असे अल जंजिराने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ट्रम्प यांनी असेही सुचवले की, जर तेहरानने व्यापक करारासाठी खरी वचनबद्धता दर्शवली, तर इराण आपला नागरी अणुकार्यक्रम दोन दशकांसाठी स्थगित ठेवण्यास ते तयार असू शकतात.

चीनच्या मध्यस्थीसाठी इराण सकारात्मक
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिकेने चर्चा सुरू ठेवण्याची इच्छा दर्शवणारे संदेश पाठवले आहेत आणि ते चीनसह कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तयार आहेत. “मदत करण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही देशाचे, विशेषतः चीनचे आम्ही स्वागत करतो,” असे अराघची म्हणाले.
इराणच्या राजधानीवरील हल्ल्यांमधील नुकसानीचा तपशील तेहरानकडून देण्यात आला आहे, महानगरपालिकेने सांगितले की, युद्धादरम्यान झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे राजधानीत किमान ६५० ठिकाणांचे मोठे नुकसान झाले, ज्यात १,२६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि किमान २,८०० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, सुमारे ५१,००० घरांचे नुकसान झाले, तसेच १०,७०० हून अधिक गाड्या आणि ७५४ मोटरसायकलचे नुकसान झाले, ज्यात जवळपास १५० टॅक्सींचा समावेश आहे.
होर्मुझमधून अधिक जहाजे जाणार: इराणने लागू केलेले “नवीन कायदेशीर नियम अनेक देशांनी स्वीकारले आहेत”, त्यामुळे इराण होर्मुझच्या सामरिक सामुद्रधुनीतून अधिक जहाजांना जाण्याची परवानगी देत आहे, असे इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने वृत्त दिले आहे.








