Varangaon News: वरणगाव शहर व परिसरातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन वरणगाव येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय तातडीने मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.
निवेदनाचा आशय असा
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विभागीय आयुक्तांना सविस्तर निवेदन देताना सांगितले की, वरणगाव हे सुमारे ६० हजार लोकसंख्या असलेले शहर असून, परिसरातील २८ गावांचे प्रमुख व्यापारी, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र आहे. ब्रिटिश कालखंडात वरणगाव हे तालुक्याचे मुख्यालय होते. त्यामुळे आजही या भागातील नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी वरणगावशी जवळीक आहे.

सध्या मात्र महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करून तहसील कार्यालयात जावे लागते. उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जमीन महसूल, फेरफार, वारस नोंद, विविध शासकीय योजनांची कागदपत्रे तसेच इतर महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांची गैरसोय दूर होणार
या सर्व बाबींचा विचार करून वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास वरणगावसह परिसरातील २८ गावांतील नागरिकांना महसूलविषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील, प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल आणि नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.










