Jalgaon City News: नागरिकांना नागरिसुविधा देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, जळगाव महानगरपालिका प्रशानाला आपल्या कर्तव्याचा विसर पडल्याची स्थिती आहे. शहरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघात व चोरीच्या घटनांची भीतीही वाढली आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील विविध भागांमध्ये अनेक पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज घेणे कठीण होत आहे. पदचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी खड्डे, उघडी गटारे आणि अडथळे अंधारामुळे दिसत नसल्याने किरकोळ अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, बंद पथदिव्यांची दुरुस्ती आणि नियमित देखभाल करण्यात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

शहरातील रस्ते प्रकाशमान ठेवणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बंद पथदिव्यांची त्वरित दुरुस्ती करून नियमित देखभाल व्यवस्था सक्षम करावी, तसेच दोषी यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिव्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन जळगाव महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








