Amalner News: प्रसूतीसाठी पॅजो रिक्षातून अमळनेरकडे येत असलेल्या आदिवासी महिलेची रस्त्यातच रिक्षामध्ये प्रसूती झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात घडली. वेळीच मदत मिळाल्याने माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. तालुक्यातील अंतुर्ली येथील शेतमजूर संगीता पावरा यांचे दिवस भरल्याने त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे त्या पतीसोबत पॅजो रिक्षाने अमळनेरकडे येत होत्या. मात्र, नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात पोहोचताच रिक्षामध्येच त्यांची प्रसूती होऊ लागली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका अफसाना खाटीक, अंतुर्ली-रंजानेचे सरपंच सचिन पाटील, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक बाळा पवार यांच्यासह काही महिला तातडीने घटनास्थळी धावून आल्या. त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. ताळे यांनी तातडीने रुग्णवाहिका तसेच योगिता कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठवले. आवश्यक ती मदत मिळाल्यानंतर महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. त्यानंतर महिला व नवजात बाळाला पुढील उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माता आणि बाळाची प्रकृती स्थिर असून दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.








