Latest Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हवामान स्थितीत बदल होत असून, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील पुणे, सातारा घाट परिसर आणि परभणी, हिंगोली,नांदेड भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी आज मुसळधार पाऊस बरसणार, मध्य महाराष्ट्रातील घाटांवर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० कि मी वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे, असे हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार
गेल्या दिड महिन्यांपासून काही भागातून पाऊस बेपत्ता आहे. अद्याप राज्यातील काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. पाऊस झाला नाही तर आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या जोरदार पावसाची नितांत गरज आहे. काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने त्याच्या प्रभावाने राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस, तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून राज्यात मंगळावरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

मंगळवारी या जिल्हयांना येलो अलर्ट
मंगळवारी पुणे सातारा कोल्हापूर घाट तसेच चंद्रपूर, गडचिरोली येलो अलर्ट दिला असून या जिल्हयात मुसळधार पावसाचा इशारा आहे. तसेच कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची पावसाची शक्यता आहे.









