बोगस डॉक्टर शोध समितीची कारवाई थंड बस्त्यात
जळगाव : चांगली आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. चांगल्या आरोग्यसेवेसाठी लोकं पैसे सुद्धा मोजण्यास तयार असतात. पण, पैसे मोजून देखील रुग्णांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातून समोर येत आहे. जळगावात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून, हे बोगस डॉक्टर्स नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. या बोगस डॉक्टरांची इतकी मुजोरी वाढली आहे की, कोणत्याही अधिकृत पदव्या नसताना किंवा वैद्यकीय कौन्सिलची नोंदणी नसतानाही थेट क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करत आहेत. काही महाभाग तर घरोघरी जावून रुग्णांवर उपचार करत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी आर्थिक फसवणूक तर होतच आहे, पण त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
प्रकार नेमका काय आहे?
शहरातील झोपडपट्टी भाग, उपनगरे आणि कामगार वस्त्यांमध्ये हे बोगस डॉक्टर अधिक सक्रिय आहेत. काही जण तर कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना ॲलोपॅथीचे उच्च क्षमतेचे अँटीबायोटिक्स आणि सलाईन रुग्णांना देतात. तात्पुरता आराम मिळावा म्हणून दिलेल्या या औषधांमुळे रुग्णांच्या किडनी, लिव्हर आणि आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
रुग्णांची केली जातेय आर्थिक फसवणूक
मुळात या बोगस डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसते. स्वत:ला डॉक्टर असल्याचे भासवून ही मंडळी समाजात वावरत आहे. या बोगस डॉक्टरांकडून किरकोळ आजारांवरही मोठे उपचार करण्याचे भासवून रुग्णांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. गोरगरीब व अशिक्षित रुग्णांना वैद्यकीय पदव्यांबाबत माहितनसल्याने त्यांचा गैरफायदा या बोगस डॉक्टरांकडून घेतला जातो.
पिंप्राळा परिसरात बोगस डॉक्टरांचं रॅकेट !
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात बोगस डॉक्टरांचा सर्वाधिक सुळसुळाट दिसून येतो. या परिसराला लागून हुडको, हरिविठ्ठल नगर, खंडेरावनगर झोपडपट्टीसारखा भाग आहे. या भागातील अशिक्षित नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी आपले दुकान थाटले आहे. या ठिकाणी काही जण असे आहेत, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही. तरी देखील ते आपले क्लिनिक थाटून बसले आहे. काही जण तर घरोघरी जावून रुग्णांना थेट सलाईन लावत असल्याची वस्तुस्थिती आहे. या बोगस डॉक्टरांकडून योग्य उपचार केले जात नसल्यामुळे अनेकदा रुग्णांची स्थिती गंभीर होते आणि शेवटच्या क्षणी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवावे लागते. गेल्या काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार समोर आला. यात एका रुग्णाला कानाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागले होते. कान दुखण्याची समस्या घेवून आलेल्या एका रुग्णावर बोगस डॉक्टरने उपचार केला. उपचारादरम्यान, या बोगस डॉक्टराच्या चुकीमुळे रुग्णाच्या कानात कापसाचा बोळा राहून गेला होता. कालांतराने इन्फेक्शन होत रुग्णाच्या कानात मोठ्या प्रकारचे इन्फेक्शन झाले होते. त्यानंतर, तो रुग्ण कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे उपचारासाठी गेला असता उपचारादरम्यान बोगस डॉक्टराकडून रुग्णाच्या कानात कापसाचा गोळा राहून गेल्याचे निष्पन्न झाले होतो. कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून योग्य उपचारानंतर आता तो रुग्ण बरा आहे. तर दुसऱ्या घटनेत बोगस डॉक्टराने चुकीच्या पद्धतीने इंजक्शन दिल्याने एका रुग्णाला कायमचे अपंगत्व आले आहे. अशा एक न अनेक घटना या बोगस डॉक्टरांकडून सर्रासपणे होताना दिसत आहे.
प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी बोगस डॉक्टर शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, ही समिती केवळ कागदावरच सक्रिय असून प्रत्यक्ष कारवाई थंड बस्त्यात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून अधूनमधून होणाऱ्या किरकोळ कारवायांव्यतिरिक्त ठोस पावले उचलली जात नसल्याने या बोगस डॉक्टरांना चांगले फावत असल्याचे विदारक चित्र आहे.








