Paldhi News: धरणगाव तालुक्यात पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक कंटेनर उलटून त्याखाली दुचाकीसह उभा असलेला २२ वर्षीय करण जनार्धन सोनवणे हा युवक दबला गेला. या दुर्घटनेत करणचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण जनार्धन सोनवणे हा युवक दुचाकी घेऊन पाळधी बायपासवरील टाहाकळी फाटा येथे चालला होता. रस्त्यांच्या कडेला त्याने मोटारसायकल एका बाजूला लावून मोबाईल फोनवर बोलत उभा होता. या दरम्यानच बायपासवरून एक कंटेनर समोरून आला. तो त्याने अचानक अनियंत्रित होऊन पलटी मारली. पलटी झालेला कंटेनर थेट करणच्या अंगावर कोसळल्याने तो त्याखाली दबला गेला.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. करणला बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून करणला मृत घोषित केले. नातेवाईकांना ही वार्ता समजताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी बायपासच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असल्याचे कोणतेच सूचना फलक याठिकाणी नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची माहिती वाहनचालकांना उशिरा मिळाल्यामुळे कंटेनर वरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर अनियंत्रित होऊन पलटी झल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. अपघातानंतर बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.








