Jalgaon News: सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. कुठलंही क्षेत्र असो प्रत्येत ठिकाणी स्पर्धा आहेचं. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही, या स्पर्धेच्या युगाच यश आणि अपयश आलचं. यश हे मनाला आनंद देणारं तर अपयश हे खच्चीरणास कारणीभूत ठरतं. पण प्रयत्नात सातत्य आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर अपयशालाही नमवता येत याचं उत्तम उदाहरण म्हणजे जळगावचे ऋषिकेश अनिल मिश्रा (मिसर). तब्बल 11 वेळा अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्नांच्या जोरावर अपयशावर मात करत, 12 व्या प्रयत्नात त्यांनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. जाणून घेऊया त्यांचा हा यशाचा प्रवास.
विदयार्थीदशेत हरवले पितृक्षत्र
ऋषिकेश अनिल मिश्रा (मिसर) यांची आज लेफ्टनंट पदावर वर्णी लागली असली तरी त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. ऋषिकेश हे अवघ्या 16 वर्षांचे असताना त्यांचे पितृक्षत्र हरपले. पोस्ट खात्यात नोकरीला असलेले त्यांचे वडील अनिल मधुकर मिश्रा यांचे 2016 साली निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आईने एकुलत्या एक ऋषिकेश आणि परिवाराचा सांभाळ केला. अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढत ऋषिकेश यांनी अभियांत्रिकीची (बी.टेक.) पदवी पूर्ण केली आणि खासगी नोकरी सुरु केली. पण, हे करत असताना जीवनात काही तरी साहसी करावं हा विचार त्यांच्या मनात कायम होता. त्यासाठी त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. पण, हे वाटतं तितकं सोप नाही हे ऋषिकेश यांच्या मेहनतीवरुन समोर येतं. खासगी नोकरी सांभाळून त्यांनी सैन्याची तयारी सुरू ठेवली. या प्रवासात त्यांची आई पूजा यांचं त्यांना प्रोत्साहन मिळालं ते सर्वात महत्त्वाचं.
11 वेळा अपयश तरी सोडली नाही जिद्द
खासगी नोकरी करत सैन्याची तयारी करणे हे आव्हानात्मक होते. दिवसभर नोकरी करुन मिळेल त्या वेळेत सैन्याची तयारी करवी हा निर्णय ऋषिकेश यांनी घेतला. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील सुरु ठेवले. या दरम्यान, अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. हे करत असताना त्यांना तब्बल 11 वेळा परीक्षेत अपयश आले. मात्र, अपयशाने खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी12 व्या प्रयत्नात ऋषिकेश यांनी लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आणि आज ते देशाची सेवा करण्यासाठी सज्ज आहे.
अशी झाली निवड
कोणतीही स्पर्धा परीक्षा असो ती कठीण असते. मात्र, भारतीय सैन्य दलातील निवड प्रक्रिया ही अधिक कठीण मानली जाते. आव्हानात्मक अशी भारतीय सैन्यातील सेवा निवड मंडळाची (एसएसबी) मुलाखत ही पाच दिवस चालते. या प्रक्रियेत मानसशास्त्रीय चाचण्या, वैयक्तिक मुलाखत, गट चाचण्यांच्या माध्यमातून उमेदवाराचे नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेतली जाते. या सर्व परिक्षांमध्ये ऋषिकेश हे पात्र ठरले.

अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करा
आपल्या यशात अपयश हाच महत्त्वाचा धडा असल्याचे मानत ऋषिकेश सांगतात की, तरुणांनी अपयशाने खचून जावू नये, अपयश हे आपल्या क्षमतेचे मोजमाप नसून आपल्याला अधिक सक्षम बनवणारा अनुभव असतो. अपयशाकडे नकारात्मकतेने न बघता अपयशामागील कारणे शोधत त्यावर काम करत पुन्हा यशासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नातील सातत्य आणि मेहनतीमुळे एक दिवस यश मिळतचं, असा विश्वासही ऋषिकेश यांनी व्यक्त केला.









