होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धुळे मनपातील ७२ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; कर्मचारी निवड समितीची शिफारस

On: September 24, 2026 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: धुळे महानगरपालिकेतील विविध संवर्गांतील रिक्त पदांवर पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने कर्मचारी निवड समितीची बैठक बुधवारी आयुक्त तथा समिती अध्यक्ष श्री. नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सेवाज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता, आवश्यक अनुभव तसेच सेवाविषयक अभिलेखांची छाननी करून विविध १५ संवर्गांतील एकूण ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रस्तावांना समितीने शिफारस केली.

महापालिकेतील पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पदनिहाय विचारक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतींची छाननी करून त्यांचा प्रकरणनिहाय निपटारा करण्यात आला. त्यानंतर लागू सेवाप्रवेश नियम, सुधारित सेवाप्रवेश नियम आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदनिहाय प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आले.

७२ पदोन्नती प्रस्ताव

यामध्ये सहाय्यक आयुक्त – २, जनसंपर्क अधिकारी – १, अधीक्षक व समकक्ष संवर्ग – ९, सांख्यिकी सहाय्यक – १, वरिष्ठ सहाय्यक व समकक्ष संवर्ग – ३५, लिपिक – ११, लेखापाल – १, उपलेखापाल – १, रोखपाल – १, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – १, उपअभियंता (स्थापत्य) – १, स्वच्छता निरीक्षक – २, सहायक अग्निशमन अधिकारी – १, टेलिफोन ऑपरेटर – १ आणि मलेरिया सुपर फिल्ड वर्कर – ४, अशा एकूण ७२ पदोन्नती प्रस्तावांना शिफारस करण्यात आली.

प्रस्तावांची छाननी

बैठकीत सदस्य सचिवांनी संबंधित पदांची मंजूर व रिक्त पदे, पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता व अनुभव तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशिलांची माहिती समितीसमोर सादर केली. समितीने सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, विभागीय परीक्षा उत्तीर्णता अथवा लागू सूट, गोपनीय अहवाल आणि अन्य आवश्यक अभिलेखांच्या आधारे प्रस्तावांची छाननी केली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त तथा समिती सदस्य करुणा डहाळे, उपायुक्त तथा सदस्य हेमंत निकम, कार्यकारी अभियंता तथा सदस्य व मागासवर्गीय प्रतिनिधी नवनित सोनवणे, सहायक आयुक्त तथा मुख्यलेखाधिकारी, सदस्य सचिव व महिला प्रतिनिधी सोनाली देवरे तसेच प्रभारी सिस्टीम मॅनेजर तथा सदस्य व अल्पसंख्यांक प्रतिनिधी बासित पठाण उपस्थित होते.

समितीच्या शिफारशीनुसार संबंधित पदांसाठी आवश्यक सक्षम प्राधिकरणाची मान्यता, लागू अटींची पूर्तता आणि रिक्त पदांची उपलब्धता यानुसार पुढील पदोन्नती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही आस्थापना विभागामार्फत करण्यात येणार आहे.

प्रशासकीय कामकाजास मिळणार गती

या पदोन्नती प्रक्रियेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय, लेखा, अभियांत्रिकी, स्वच्छता, अग्निशमन आणि आरोग्यविषयक विभागांना अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून विभागीय कामकाजाची गती वाढण्यास तसेच नागरिकांना सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यास हातभार लागणार आहे.

पदोन्नती प्रस्तावांसाठी सेवाविषयक अभिलेख संकलन, छाननी तक्ते व आवश्यक कागदपत्रांची तयारी करण्याचे काम आस्थापना विभागातील संजय मोरे, अधीक्षक, काळु साबळे, वरिष्ठ सहाय्यक आणि प्रतिक कुंभार यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment