Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी रविवारी जिल्हाभर एकाचवेळी विशेष मोहीम राबवून अवैध दारू व्यावसायिकांना दणका दिला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत विविध ठिकाणी छापे टाकून १३७ गुन्हे दाखल करत १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ३१ लाख ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष मोहिम
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदारांनी या विशेष मोहिमेत सहभाग घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे, अवैध विक्रीची ठिकाणे, दारू साठवणूक केंद्रे तसेच अवैध दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कारवाई करण्यात आली.
४७ हजार लिटर रसायन जप्त
कारवाईदरम्यान ४ हजार ६९ लिटर गावठी दारू आणि तब्बल ४७ हजार ८१६ लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच देशी व विदेशी दारूच्या बाटल्याही हस्तगत करण्यात आल्या. हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल व साहित्य नष्ट करून अनेक अड्डे उद्धस्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२ हजार ५०६ गुन्हे दाखल
दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात दारूबंदी कायद्यान्वये २ हजार ५०६ गुन्हे दाखल करून २ हजार ५२२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारू निर्मिती, विक्री अथवा वाहतुकीची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.








