Jalgaon News: शहराबाहेरील बायपास अपूर्ण असल्याने अवजड वाहनांची वाहतूक शहरातून सुरू असून, गेल्या तीन महिन्यांत नऊ जणांना जीव गमवावा लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली दुरुस्ती आणि समांतर रस्त्यांच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाला जाणवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आकाशवाणी चौकात दुचाकी अपघातांचा सजीव देखावा साकारून आंदोलन करण्यात आले.
एखाद्या अपघातात व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा केवळ एक जीव संपत नाही, तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून जाते. कुटुंबाचा आधार हरवतो, मुलांचे भविष्य अंधारात जाते आणि आई-वडील, पत्नी व मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. रस्त्यांवरील असुरक्षिततेमुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असतील, तर ही केवळ अपघातांची मालिका नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेपुढील गंभीर प्रश्न आहे, अशी भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली.
समांतर रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागत आहे. खोटेनगर ते कालिका माता मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्क्रॅपिंग करून दोन महिने उलटले, तरी पुढील काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याचा पृष्ठभाग उखडलेल्या अवस्थेत असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकीकडे बायपासचे काम अपूर्ण, दुसरीकडे समांतर रस्त्यांची कामे रखडलेली आणि महामार्गाची दुरुस्तीही प्रलंबित, अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित प्रवास करायचा तरी कसा, असा सवाल मनसेने उपस्थित केला.
प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणे
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सजीव देखाव्यात दुचाकी अपघाताचे दृश्य, रस्त्यावर पडलेले वाहनचालक आणि अपघातानंतर सुरू होणारी बचावाची धडपड दाखवण्यात आली. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात कसा घडू शकतो, हेही प्रात्यक्षिकातून मांडण्यात आले. या देखाव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. देखाव्याच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करा
राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांनी समन्वय साधून खोटेनगर ते कालिका माता मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, समांतर रस्त्यांची कामे वेगाने मार्गी लावावीत आणि बायपासचे काम लवकर पूर्ण करावे. बायपास सुरू होईपर्यंत शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर योग्य निर्बंध घालून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केली.
जळगावकरांचे जीव स्वस्त नाहीत..
“जळगावकरांचे जीव स्वस्त नाहीत. रस्ते विकासासाठी असतात, नागरिकांचे जीव घेण्यासाठी नाहीत. आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. समांतर रस्त्यांची कामे आणि स्क्रॅपिंग केलेल्या महामार्गाची दुरुस्ती लवकर पूर्ण झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाब विचारेल,” असा इशारा ॲड. देशपांडे यांनी दिला.
वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश
आंदोलनादरम्यान नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे याबाबतही संदेश देण्यात आला. रस्ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असली, तरी प्रत्येक वाहनचालकानेही स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. सजीव अपघात देखावा सादर केल्यानंतर वाहतूक पोलीस सोनाली पवार आणि पोलीस बांधव सिद्धार्थ ढवळे यांनी बचावकार्याच्या प्रात्यक्षिकात मदत केली.

या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, आशुतोष जाधव, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे रजाक सय्यद, शहर सचिव जितेंद्र पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, राहुल चव्हाण, पंकज चौधरी, चेतन पाटील, समाधान सपकाळे, दीपक राठोड आणि खुशाल ठाकूर उपस्थित होते. ललित शर्मा, खुशाल ठाकूर आणि दीपक राठोड यांनी सजीव अपघात देखाव्यात सहभाग घेतला. आंदोलनाची संपूर्ण तयारी उपमहानगराध्यक्ष आशुतोष जाधव यांनी केली.
नागरिकांचे जीव वाचवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धावपळ करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत करणे गरजेचे आहे. जळगाव शहर अपघातमुक्त व्हावे आणि रस्त्यांवरील निष्काळजीपणामुळे कोणत्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू नये, हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.








