Mumbai News: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी कोटा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पुणे-जयपूर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (१२९३९) मधून त्यांना अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, रविवारी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांपैकी यातील दोघे असल्याचा संशय आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तिघांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे.
दरम्यान दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाल्याने टायगर श्रॉफचे प्राण वाचले, असे एका व्हायरल व्हिडिओ मधून दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.
टायगर श्रॉफच्या हत्येच्या प्रयत्नात कथितरित्या सामील असलेल्या तीन संशयित शूटर्सना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. हे तिघे ट्रेनने प्रवास करत होते, असे वृत्त आहे. आरोपींपैकी दोघे हरियाणाचे आणि एक महाराष्ट्राचा आहे. हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
गोळीबारी करणारे आरोपी कोण आहेत?
शार्प शूटर्समध्ये सामील असलेला रेहान आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा हे हरियाणातील सोनीपतचे रहिवासी असल्याचे पुढे आली आहे. हृतिक कुमार उर्फ रोशन हा मुंबईचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक कुमार उर्फ रोशन हा रॅपिडो ड्रायव्हर आहे. संशयित तिघा आरोपींना पोलिसांनी पुणे-जयपूर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (१२९३९) मधून ताब्यात घेण्यात आले आहे.
टायगर श्रॉफ हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात त्यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारातून बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी १५ पथके तयार केली होती. या घटनेत टायगर श्रॉफचा चालक आणि एक ऑटो-रिक्षा चालक जखमी झाले. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या पोस्टच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पश्चिम मुंबईतील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्कजवळ घडली.
दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम अन् वाचले प्राण?
फुटबॉलमध्ये नेहमी हजेरी लावणारे टायगर श्रॉफ १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून फुटबॉलच्या मैदानावरून बाहेर निघत होते. त्याठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना घेरले. गाडी क्षणभर थांबली आणि त्याच क्षणी, गाडीच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. एकाने ड्रायव्हरवर निशाणा साधला, तर दुसऱ्याने अगदी जवळून टायगर श्रॉफवर गोळी झाडली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, गोळीबार करताना बंदूक जाम झाली असावी, ज्यामुळे नेमबाजाची गोळी टायगर श्रॉफला लागली नाही. गोळी चुकली असावी असा कयास लावला जात आहे. त्याचमुळे टायगर श्रॉफचे प्राण वाचले.
बिश्नोई गँगचा बॉलिवूडवर दबदब्याचा प्रयत्न
मुंबईवर आपला दबदबा निर्माण करण्याचा बिश्नोई गँग प्रयत्न करत असल्याचे बोललं जात आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या अनिल पंडित आणि हरमन संधू नावाच्या गुन्हेगारांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सलमान खानचाही उल्लेख केला आहे. मात्र, पोलिसांनी या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या घरावर देखील गोळीबार झाला होता.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली टायगर श्रॉफची भेट
अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये टायगर श्रॉफ जखमी झाल्याचे दिसत आहे. फोटोंमध्ये टायगर श्रॉफ त्याच्या घरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून बोलत आहे.अन् त्याच्या हातावर आणि छातीच्या मध्यभागी पट्टी बांधलेली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, टायगर श्रॉफला गोळी लागलेली नाही आणि तो सुरक्षित आहे.










