Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला होता. या अपघाताबाबत रोहीत पवार यांनी मोठं वक्तव्य केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. रोहीत पवार यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले. रोहीत पवारांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित करत विमानाचा पायलट आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.
रोहीत पवार म्हणाले, मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या.
या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते.
विमानात जास्त इंधन असल्याने मोठा स्फोट झाला. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलटने माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या लँडिगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. त्यामुळे विमान बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे.
पायलटने विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी करत या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो, असे ते म्हणाले.
व्हीएसआर कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड
रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. या आरोपानुसार, व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी यावेळी केली.










