New Delhi: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोल प्लाझावरून प्रवास करणाऱ्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने एका महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला असून आपल्या ‘राजमार्गयात्रा’ मोबाइल ॲपवर,‘टोल प्लाझा फीडबॅक’ हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य सादर केले आहे.याद्वारे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्यांना टोल प्लाझावरील त्यांचे अनुभव मांडता येतील.या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचा सहभाग बळकट करणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर करणे हा आहे.
वापरकर्त्यासाठी सुलभ अभिप्राय प्रक्रिया
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावरील सेवा सुधारण्यासाठी एनएचएआय वापरकर्त्यांच्या अभिप्रायाला प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा ओलांडल्यानंतर, वार्षिक पास वापरकर्त्यांना त्यांच्या राजमार्ग यात्रा ॲपवरून एक सूचना येईल, ज्यामध्ये त्यांना त्यांचा टोल प्लाझावरील अनुभव सामायिक करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. याव्यतिरिक्त, सर्व वापरकर्ते आता कोणत्याही टोल प्लाझाबद्दल आपला अभिप्राय देण्यासाठी ॲपच्या मेनू विभागातील “टोल प्लाझा फीडबॅक” या सुविधेचा वापर करू शकतात. वापरकर्ते स्केलवर त्यांच्या अनुभवाला श्रेणी देऊ शकतात, त्यांच्या प्रवासाशी संबंधित पर्याय निवडू शकतात, तसेच काही शेरे असल्यास तेही जोडू शकतात.
समस्या निदर्शनास आणण्यासाठी एक माध्यम
हमुख्य वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना त्यांच्या अनुभवांची माहिती देण्यासाठी आणि लक्ष देण्यायोग्य समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देते. तसेच, टोल प्लाझा सेवांमध्ये सुधारणांची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांना ओळखण्याच्या आणि त्यांचे निरीक्षण करण्याच्या एनएचएआयच्या प्रयत्नांनाही यामुळे मदत होईल.

एनएचएआय राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना टोल प्लाझा फीडबॅक सुविधेचा सक्रियपणे वापर करण्यास आणि राजमार्गयात्रा ॲपद्वारे आपले अनुभव सामायिक करण्यास प्रोत्साहन देत आहे. नागरिकांच्या अशा प्रकारच्या सहभागामुळे एनएचएआयला वापरकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास आणि संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवरील टोल प्लाझांवरील सेवा वितरण सुधारण्याच्या दिशेने काम करण्यास मदत होईल.









