Jalgaon News: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या कार्यक्रमांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयीन आस्थापनेवर बाह्यस्त्रोता (Outsourcing) ऐवजी थेट सेवा करार पद्धतीने (DBT -ठोक मानधन) कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना रिक्त व नव्याने निर्माण होणाऱ्या समकक्ष पदांवर सामावून घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी ‘कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती’तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ. बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट
गेल्या २०२१ या वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील कोविड कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी शासन-प्रशासन स्तरावर लढा देत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या ३ मे २०२१ रोजीच्या परिपत्रकातील मुद्दा क्र. १७ नुसार, ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी किमान १०० दिवस कोविड सेवा पूर्ण केली आहे, त्यांना भविष्यातील नियमित अथवा कंत्राटी नियुक्त्यांमध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे.

तथापि, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक (NHM) मुंबई यांच्या ७ ऑगस्ट २०२६ च्या पत्रानुसार सेवा केवळ बाह्यस्त्रोताद्वारे (Outsourcing) घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, यात कोविड कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर, २२ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत राज्यमंत्र्यांनी आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय (मुंबई) यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पाचोरा येथे आ. बच्चू कडू यांना निवेदन
त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे आयोजित ‘शिवसंवाद’ कार्यक्रमादरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री व आ. बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा मांडत मागण्यांचे निवेदन दिले.
संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या:
- बाह्यस्त्रोत (एजन्सी) ऐवजी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट ठोक मानधन जमा होणाऱ्या (DBT) सेवा करार पद्धतीने नियुक्ती द्यावी.
- रिक्त पदांवर व नव्याने निर्माण होणाऱ्या समकक्ष पदांवर कोणतीही अट न ठेवता थेट सामावून घ्यावे.
- कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात यावी.
यावेळी निवेदन देताना कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीचे निलेश बोरा, बबन सावळे, गजू कोळी, लक्ष्मण पाटील, सागर बाविस्कर, विनोद सपकाळे, यश कुमावत, अमोल बाविस्कर, कुवरसिंग पावरा, निलेश बारेला, प्रतिक्षा सोनवणे, ऐश्वर्या सोनवणे, भाग्यश्री चौधरी, शिला सपकाळे, रमेश वानखेडे, संतोष ताडे आदी कंत्राटी कोविड कर्मचारी उपस्थित होते.











