Nashik News: नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार व शोषणाच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनने (NITA) सातपूर येथे विशेष बैठक आयोजित केली होती. आयटी कंपनीच्या कार्यस्थळी सुरक्षितता, नैतिक आचरण आणि भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना जाहीर केल्या असून त्याचे पालन सर्वानी करावे असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लैगिक शोषण प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सूचना ही करण्यात आल्या.
POSH लैगिक छळाच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ‘पॉश’ची अंमलबजावणी व लहान कंपन्यांना NITA चे पाठबळ मिळणार आहे. प्रत्येक सदस्य कंपनीत POSH कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व आयसीसीची सक्रिय कार्यवाही अनिवार्य करण्यात येणार आहे. नाशिकमधील लहान आयटी कंपन्यांना धोरण आखणी व समिती स्थापनेसाठी नीट (NITA) स्वतः मार्गदर्शन व सहकार्य करेल. लवकरच सदस्य कंपन्यांसाठी (POSH) ‘पॉश’बाबत जागृती कार्यशाळा व एचआर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
‘एचआर’साठी तातडीचे निर्देश
कोणतीही तक्रार अत्यंत संवेदनशील बाब म्हणून हाताळणे HR विभागावर बंधनकारक राहील. तक्रार दाबणे वा दुर्लक्ष करणे खपवून घेतले जाणार नाही.
नियुक्तीपूर्वी सर्वंकष पडताळणी : प्रत्येक उमेदवाराची पोलीस व्हेरिफिकेशन, स्टॅम्प पेपर बाँड व संपूर्ण पार्श्वभूमी तपासणी रुजू होण्यापूर्वीच पूर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती प्रक्रियेत नैतिक आचरण व पारदर्शकता अत्यावश्यक आहे.
धार्मिक भावनांचे संरक्षण : कार्यस्थळी कोणत्याही कर्मचाऱ्याच्या धार्मिक भावनांशी खेळणे वा धर्मांतरासाठी दबाव टाकणे हे गंभीर गुन्हा म्हणून गणले जाईल. प्रत्येक कंपनीत धार्मिक सौहार्दाचे लिखित धोरण बंधनकारक राहील.
या बैठकीस NITA अध्यक्ष अमर ठाकरे, आयटी उद्योजक प्रदीप पेशकार, अरविंद महापात्रा , विशाल जाधव, सुधीर गोराडे, नदीम शेख, नि खिल देवरे, परिमल मोदी , अरविंद कुलकर्णी (एचआर एक्स्पर्ट) ,गायत्री पाटील व माजी अध्यक्ष मकरंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘एनआयटीए’तर्फे लवकरच कार्यशाळा
“नाशिकमधील प्रत्येक आयटी कंपनीच्या मालकांनी व HR विभागांनी आत्ताच आपल्या POSH धोरणांचा आढावा घ्यावा. NITA लवकरच जागृती कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार असून असे प्रकार नाशिकच्या आयटी क्षेत्रात पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
-अमर ठाकरे, अध्यक्ष, NITA







