Palghar News: जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील ५ जण मोटारसायकलवरून घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पीटीआय वृत्तसंस्थनं ही पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली आहे.
घटना अशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे जव्हार तालुक्यात घडली. हे पाच विद्यार्थी सरसुन गावातील नवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी हिराडपाडा गगनगिरी आश्रम शाळेतून गुपचूप बाहेर पडले होते. मोटारसायकल भाड्याने घेतली. गरबा खेळण्यासाठी एकाच दुचाकीवर पाच विद्यार्थी गेलं होते. तेथून परतत असतांना हा अपघात घडला. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक, वॉर्डन आणि चौकीदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत सुमित मोतीराम गिंभल, प्रीतम पोटिंदा या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर, सुमित मोरे, रुस्तुम पोटिंदा, सुजित पोटिंदा हे तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम जव्हार त्यांनतर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान विद्यार्थ्यांच्या निवासासह सुरक्षितेची जबाबदारी आश्रमशाळा प्रशासनावर आहे. रात्रीच्या वेळी विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर गेले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था कशी होती? आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती दुचाकी कशी आली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.











