Iran War Update:ओमानच्या किनाऱ्याजवळ २४ भारतीय खलाशी असलेल्या एका ऑइल टँकरला आग लागल्याचे वृत्त भारताच्या जहाजबांधणी प्राधिकरणाने दिले आहे. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.’मॅडागास्कर’चा ध्वज असलेल्या ‘मॅरिव्हेक्स’ (Marivex) या जहाजावर कोणताही माल (कार्गो) नव्हता, अशी माहिती केंद्रीय बंदर आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“सर्व भारतीय खलाशी सध्या सुरक्षित आहेत. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास, भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाशी समन्वय साधत आहोत,” असे शर्मा म्हणाले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. याबाबत अल जंजिराने वृत्त दिले आहे.

इस्रायलला ट्रम्प लगाम घालणार का?
एका विश्लेषकाच्या मते, इस्रायलमधील नेतान्याहू सरकारवर अमेरिकेचा असलेला प्रभाव हा केवळ “फोन कॉल्स आणि केवळ शब्दांपलीकडचा” आहे. परंतु, पंतप्रधान नेतान्याहू आणि इस्रायलच्या युद्धयंत्रणेला लगाम घालण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेमकी कोणती पावले उचलतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’चे डेव्हिड वुड्स यांनी सांगितले.
“अमेरिका खरोखरच व्यावहारिक दबावाचा वापर करण्यास किती तयार आहे? यात केवळ शस्त्रास्त्रांची विक्रीच नाही, तर कदाचित लष्करी कारवायांसाठी गुप्तचर माहिती (intelligence) सामायिक न करणे किंवा क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमध्ये सहभागी न होणे, अशा गोष्टींचाही समावेश असू शकतो,” असे वुड्स म्हणाले. “वॉशिंग्टनमधून फोनवर सुनावलेल्या कठोर शब्दांपेक्षा अशा प्रकारच्या व्यावहारिक दबावाला इस्रायल नक्कीच अधिक गांभीर्याने प्रतिसाद देईल.” असे वूड्स म्हणाले.










