Praful Patel On Sunetra Pawar Deputy CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादक शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार कोणाकडे सोपवायचा, पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचे? हा प्रश्न पक्षासाठी महत्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत प्रफुल पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली.
काय म्हणाले प्रफुल पटेल ?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करायची, हा निर्णय सर्व आमदारांच्या भावना, जनभावना आणि पक्षातील अंतर्गत समीकरणांचा विचार करून घेतला जाईल, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा, मग…
आजच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या राजकीय शोकाची भावना असून, घरगुती कार्यक्रम सुरु असल्याने, सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा रात्री वा उद्या केली जाईल, असेही पटेल यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्रीपदाची जागा लवकरच भरली जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.










