Borivali News: बोरीवली भागात मंगळवारी केलेल्या एका कारवाईत सुमारे १० कोटी रुपये किमतीचे २ किलोहून अधिक हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने ही करावी केली. बोरीवली पोलीस ठाण्यात ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस’ (NDPS) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरीवली गुन्हे शाखेने शहरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून अंदाजे १०.१६ कोटी रुपये किमतीचे २.०३२ किलो हेरॉइन जप्त केले आहे,” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. तसेच या कारवायांदरम्यान सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
कांदिवलीत दोन संशयितांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी कांदिवली पश्चिम भागात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून ७५८ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे ३.७९ कोटी रुपये आहे.दरम्यान ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग होती.
पुढील कारवाईत तिसऱ्या व्यक्तीला अटक
अटक केलेल्या दोन संशयितांची चौकशी करत असताना पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली, ज्याच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी आणखी एक कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून १,२७४ ग्रॅम हेरॉइन जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे ६.३७ कोटी रुपये आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण २,०३२ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले असून, त्याचे एकूण मूल्य १०.१६ कोटी रुपये आहे.

आंतरराज्य तस्करी नेटवर्कचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासावरून असे लक्ष आले की, हे आरोपी कदाचित एखाद्या आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी टोळीशी संबंधित असू शकतात. पोलीस त्यांच्या नेटवर्कचा शोध घेत आहे. मुंबई गुन्हे शाखा आता या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेत असून, या तस्करीच्या जाळ्याचा सखोल तपास करत आहे, जेणेकरून यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका स्पष्ट होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडून १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली आहे. अवघ्या दोन दिवसांत ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस’ (NDPS) कायद्यांतर्गत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २१ वॉन्टेड किंवा फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ही कारवाई १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या दोन दिवसांच्या विशेष अमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली.”
पोलिसांच्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ४६.१६ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. गांजा, मेफेड्रोन (एमडी), हेरॉइन किंवा ब्राऊन शुगर, चरस, एलएसडी पेपर, कोकेन, हशीश आणि हायड्रोपोनिक गांजा. याव्यतिरिक्त, त्यांनी कोडीनयुक्त खोकल्याच्या औषधाच्या ९,५४० बाटल्या आणि ९.४७ लाख रुपये रोख रक्कमही जप्त केली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अमली पदार्थांचे मूल्य १५.८७ कोटी रुपये इतके आहे.










